दिला इशारा जाता जाता...! माझे व्हायचे ते झाले, आता तुमची चिंता करा : खैरे

Foto

औरंगाबाद : जिव्हारी लागलेल्या पराभवाने खैरे भयंकर संतापले आहेत. मित्रपक्ष भाजपसह सेनेच्या नगरसेवकांनी आपल्या विरोधात काम केल्याचे मतदानाअंती त्यांना कळून चुकले. शहरातील तीनही मतदारसंघात ट्रॅक्टर धावल्याने खैरेंच्या जखमेवर मीठच चोळले गेले. याचा वचपा काढण्याचा इशारा त्यांनी मतदान केंद्रातून बाहेर पडताना दिला.  ’माझे व्हायचे ते झाले, आता तुमची चिंता करा’ असे ते उपस्थित भाजप सेनेच्या नेत्यांना म्हणाले. खैरे यांचे हे उद्गगार येणार्‍या काळात बदलत्या राजकीय समीकरणाची दिशाच स्पष्ट करणारे आहेत.

सकाळी अकराच्या सुमारास मतदान केंद्रात दाखल झालेल्या खैरेंच्या चेहर्‍यावर चिंता स्पष्ट झळकत होती.  स्मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी  खैरे येताच घोषणाबाजी सुरू केली.  तर मतदान केंद्राच्या  प्रवेशद्वाराजवळ  जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि ऋषिकेश खैरे स्वागतासाठी हजर होते.  त्याावेळी  खैरे तिसर्‍या क्रमांकावर होते. दानवे यांनी सगळी परिस्थिती खैरेंच्या कानात कथन केली  खैरेंचा चेहरा  पडला होता  माध्यमांचे छायाचित्रकार आणि पत्रकारांनी खैरे  वर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र खैरेंनी प्रतिसादच दिला नाही अन ते थेट मतमोजणी केंद्रात शिरले. 

शेवटपर्यंत खैरे तेथेच ठाण मांडून होते. 25 व्या फेरीला इम्तियाज जलील यांची आघाडी आणि मतमोजणी यांची आकडेमोड करून आता आपला विजय शक्य नाही, असे दिसताच खैरे यांनी काढता पाय घेतला. निवडणुकीच्या काळात खैरे यांनी घातलेली अत्यंत संयम आणि शांततेची वस्त्रे पराभवानंतर  क्षणार्धात गळून पडली. मीडिया तसेच बाहेर जमलेल्या समर्थकांना टाळून खैरे मागच्या दाराने मार्गस्थ झाले. मात्र जाता जाता त्यांनी इशाराच दिला. माझे व्हायचे ते झाले, आता तुमचे बघा...असा टोला त्यांनी लगावला अन संतापाला वाट मोकळी करून दिली.

हा इशारा कुणाला...
 खैरेंचा इशारा थेट मित्र पक्ष भाजपला होता, असे जाणकारांचे म्हणणे आहे. भाजपच्या नगरसेवकांनी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी उघड उघड ट्रॅक्टरचे काम केले असा आरोप होतो आहे. शहरातील भाजपाची मंडळीही छुप्या पद्धतीने ट्रॅक्टरचे काम करीत होती हेही लपून राहिलेले नाही. पूर्व पश्चिम, मध्य मतदारसंघात सेनेच्या नाकावर टिच्चून ट्रॅक्टरने मोठे मतदान घेतले. ही सगळी मते शिवसेनेची हक्काची होती. त्यामुळेच खैरेंच्या जखमेवर मीठ चोळले गेले. ग्रामीण भागानेही खैरेंना दगा दिला. पहिल्या फेरीतच गंगापूर, वैजापूर आणि कन्नड या ग्रामीण पट्ट्यात पहिल्या 8 फेर्‍यांमध्ये खैरे चक्क तिसर्‍या क्रमांकावर होते. याचा अर्थ हक्काच्या मतपेढीनेच खैरेंना दगा दिला. या दगाबाजीचे पुरेपूर उट्टे खैरे येत्या काळात काढतील यात शंका नाही.